नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेत विरघळलेले विष कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी झाली असली तरी दिल्लीतील प्रदूषण गंभीर श्रेणीत आहे. राजधानीतील हवा अजूनही विषारीच आहे. सोमवारी सकाळी धुक्याच्या जाड थराने दिल्ली व्यापली आणि अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ श्रेणीमध्ये नोंदवली गेली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, (सीपीसीबी), दिल्लीत सोमवारी हवेची गुणवत्ता (एक्यूआय) ४१९ सह गंभीर श्रेणीत नोंदवली गेली. तसेच दिल्ली आणि एनसीआरमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस पडल्यास प्रदूषणापासून नक्कीच काहीसा दिलासा मिळेल.
सीपीसीबीनुसार, दिल्लीतील आयटीओ येथे एएक्यूआय ४३५, द्वारका सेक्टर ८ येथे एएक्यूआय ४०२, जहांगीरपुरी येथे एएक्यूआय ४३७ आणि अशोक विहार येथे एएक्यूआय ४५५ नोंदवले गेले. हे सर्व एएक्यूआय हवेच्या तीव्र श्रेणीतील आहेत. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी वाईट आहे, त्यामुळे फुफ्फुसांचे नुकसान होत आहे. वृद्ध लोकांना प्रदूषणामुळे अस्वस्थता वाटत आहे. यामुळे लोक सकाळी चालणे आणि सायकल चालवणे टाळत आहेत.
दिल्लीत प्रदूषणासोबतच थंडीही वाढली असून येथे पावसाळी वातावरण आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मध्यम ढगाळ वातावरण राहणार आहे. मध्य प्रदेशात वादळ, जोरदार वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, पूर्व उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.