नवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत घोटाळा करुन उमेदवारी मिळवणा-या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पटियाला कोर्टानं गुरुवारी फेटाळला. त्यामुळं पूजाला मोठा झटका बसला असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कालच पूजा खेडकरवर युपीएससीनं कठोर कारवाई करत तिची उमेदवारी रद्द केली होती. तसंच भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर युपीएससीनं तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसंच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजानं मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नव्हते. तसेच पुणे पोलिसांनी देखील देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील तिने दखल घेतली नव्हती. दरम्यान, पूजाने दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती त्याचा निकाल कोर्टाने राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करताना पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून काढून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.