पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका विचित्र वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. आज बिहार विधानसभेत जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यावेळी चर्चेदरम्यान नितीश कुमार यांच्या एका वक्तव्यावरून वाद झाला. लोकसंख्या नियंत्रण आणि महिला साक्षरतेवर बोलताना नितीश यांनी विचित्र वक्तव्य केले.
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे.
मुली शिक्षित होत आहेत, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. हे समजून सांण्यासाठी नितीश कुमारांनी एक विचित्र उदाहरण दिले. ते म्हणाले, लग्न झाल्यावर पुरुष रोज रात्री संबंध ठेवतात, त्यामुळेच मूले जन्माला येतात. महिला साक्षर असेल, तर ती पुरुषाला नकार देऊ शकते, यामुळे लोकसंख्याही नियंत्रणात येईल. या वक्तव्यादरम्यान संपूर्ण सभागृहातील नेते चकीत झाले. यावर महिला आमदार संतप्त दिसल्या, तर इतर काही आमदार हसत होते.
आपल्या भाषणात नितीश पुढे म्हणाले की, २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण ६१ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांच्या वर पोहोचले आहे. स्त्री साक्षरतेत बरीच सुधारणा झाली आहे. हा आकडा ५१ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांच्या वर गेला आहे. मॅट्रिक पासची संख्या २४ लाखांवरून ५५ लाखांवर गेली आहे. पदवीधर महिलांची संख्या ४ लाख ३५ हजारांवरून ३४ लाख झाली आहे.