छत्रपती संभाजीनगर – प्रकाश आंबेडकर यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आमच्यातही तरुणमंडळी त्यांना मानतात. कारण ते स्पष्ट आणि खरे बोलतात. मग कुणीही असो. त्यांच्या स्पष्टपणाला मी मानतो. त्यामुळे त्यांचा सल्ला मला मान्य आहे, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मी १०० टक्के मानतो. पण मला सल्लागार कुणी नाही. मी कुणाचे सल्ले मानत नाही पण त्यांचा मान्य करतो. कारण त्यांच्याकडे प्रामाणिकपणा आणि स्पष्टपणा आहे. ते कायद्याचे, संविधानाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे जर यशस्वी व्हायचे असेल तर अशा व्यक्तीचा सल्ला ऐकला पाहिजे या मताचा मी आहे. माझ्या आणि त्यांच्या वयात खूप फरक आहे. मला त्यांचा सल्ला मान्य आहे.
परंतु मला सल्लागार नाही. हे अंतिम सत्य आहे. कुणीही शोधून दाखवावे असे त्यांनी म्हटले.
तसेच माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. काहीजणांनी वेगळ्या समुदायाकडे पाहून ते विधान केले असे पसरवले. मला काय बोलायचे आहे हे समजून न घेता विनाकारण एका समुदायाबाबत बोलले. माझ्या पट्ट्यात पाहा, माझा एकाही जातीसमुदायाला विरोध नाही.
कुणीही मला हाक मारली तरी मी सहकार्याला उभा राहतो. त्यामुळे कोणतीही जात-धर्म असो, माझ्या मनात त्यांच्याबद्दल आणि त्यांना माझ्याबद्दल खूप आदर आहे. माझ्या विधानाचा वेगळा अर्थ घेऊन काहीजणांनी त्यात राजकारण केले. परंतु आजपासून मला शंभर टक्के प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य आहे. पण मला त्यादृष्टीने म्हणायचे नव्हते. विनाकारण अंगावर ओढून घेतले. हा लढा मोठा असून त्याच्याबद्दल राज्यात संभ्रम निर्माण करायला नको, असेही स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
दरम्यान, निष्पाप लोकांवर गुन्हे नोंदवणार नाही असे सरकारने म्हटले होते. परंतु अंतरवाली सराटीत काही जणांना अटक केले. मला अजून सविस्तर माहिती नाही. मी जेव्हा तिथे जाईन तेव्हा अधिकृत माहिती घेतल्यावर बोलेन असे जरांगे म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी काय दिला होता सल्ला?
जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. जरांगे पाटील यांना सल्ला आहे की, सल्लागारांचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी जी चूक केली होती, ती करू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. जरांगे पाटील यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरून केली, तशी चूक करू नये. जरांगे यांनीही आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असे कृपा करून आणू नये, असाही आंबेडकर यांनी सल्ला दिला.