वॉशिंग्टन : हवाई हल्ले करणा-या दुश्मनांसाठी एक दुख:द बातमी असून भारतावर वाईट नजर ठेऊन हवाई हल्ले करणा-यांनी आता सांभाळून रहावे. कारण, भारताची ताकद आता वाढली आहे. अमेरिकेसोबत झालेल्या करारात प्रीडेटर ड्रोन भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिकच भर पडणार आहे.
अमेरिकेने भारताला ३१ एमक्यू-९ बी प्रीडेटर ड्रोन देण्याच्या कराराला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौ-यात या कराराची घोषणा करण्यात आली होती. ३१ ड्रोनशिवाय इतर अनेक तंत्रज्ञान आणि शस्त्रे भारताला विकली जातील. संपूर्ण कराराची अंदाजे किंमत सुमारे ४ अब्ज डॉलर्स (सुमारे ३२ हजार कोटी रुपये) आहे. अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की या करारामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मजबूत होतील. प्रस्तावित मेगा ड्रोन डील भारताच्या सीमा सुरक्षेत गेम चेंजर ठरेल. आधुनिक मॉडेल्ससह सुसज्ज हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोनमध्ये सर्व हवामानात उड्डाण करण्याची आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता आहे.
प्रीडेटर ड्रोनचे महत्व
या करारांतर्गत, भारताला दोन प्रकारचे प्रीडेटर ड्रोन मिळतील. स्काय गार्डियन आणि सी गार्डियन. सागरी सिमेवर पाळत ठेवण्यासाठी सी गार्डियन ड्रोन आणि जमिनीच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी स्काय गार्डियन ड्रोन तैनात केले जातील. ३१ ड्रोनपैकी आर्मी आणि एअर फोर्सला प्रत्येकी आठ स्काय गार्डियन व्हर्जन मिळतील. तर, नौदलाला एमक्यू-९बीच्या १५ सी गार्डियन व्हर्जन देण्यात येतील.
ड्रोनची खास वैशिष्ट्ये
ड्रोन रचना अशा प्रकारे केली गेली आहे की सुरक्षा दलांना कमी वेळेत परिस्थितीजन्य माहिती मिळू शकेल. ड्रोन लिंक्स मल्टी-मोड रडार आणि प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड सेन्सर्ससह येतो. आपोआप टेकऑफ आणि लँडिंग करू शकतो. विशेष म्हणजे ते ४० तासांपेक्षा जास्त वेळ सतत काम करू शकतात. अहवालानुसार, ते ४० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात आणि १,८५० किलोमीटरपर्यंत माहिती गोळा करू शकतात. याचा अर्थ असा की दिवस असो वा रात्र, प्रत्येक हंगामात हे प्रीडेटर ड्रोन हजारो फूट उंचीवरून शत्रूंच्या हालचालींवर तासनतास लक्ष ठेवू शकतात.
सीमेवरील सुरक्षा कशी मजबूत होणार?
अमेरिकेचे प्रीडेटर ड्रोन सध्याच्या आणि भविष्यातील धोक्यांना तोंड देण्याची भारतीय सुरक्षा दलांची क्षमता सुधारेल. या करारानंतर चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर भारताची स्थिती मजबूत होईल. या मानवरहित हवाई वाहनांमध्ये लढाऊ विमानांसारख्या शत्रूच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे आणि दारुगोळा डागण्याची क्षमता आहे.
मानवरहित संचलन
मानवरहित हवाई वाहनाच्या मदतीने सीमेपलीकडील शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारत अमेरिकेकडून खरेदी करत असलेल्या ड्रोनमध्ये हेलफायर मिसाईल आणि लेझर गाईडेड बॉम्बही बसवले जाऊ शकतात. चिनी सैन्याकडे स्वत:चे सशस्त्र ड्रोनही आहेत. तथापि, एमक्यू-९बी प्रीडेटर ड्रोनमध्ये प्रगत क्षमता आहे.