24.8 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयमतमोजणीची तयारी पूर्ण; कडेकोट सुरक्षा

मतमोजणीची तयारी पूर्ण; कडेकोट सुरक्षा

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान पूर्ण झाले आहे. ३ डिसेंबरला म्हणजे रविवारी ४ राज्याचे निकाल लागतील तर सोमवारी मिझोराम निकाल हाती येतील. मतमोजणीच्या एक दिवस आधी, शनिवारी भाजप आणि काँग्रेस आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, पाचही राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी स्थळांवर कडेकोट सुरक्षा राहणार आहे. रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे.

मतदान केंद्रांच्या संख्येनुसार मतमोजणीचा टप्पा ठरविण्यात आला असून पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहे. प्रत्येक फेरीच्या मोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्राँग रूममधून मतमोजणी हॉलमध्ये मशीन पोहोचण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र मार्ग/व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे, ज्यामध्ये सीसीटीव्ही कव्हरेज असेल. मतमोजणी सभागृहात निवडणूक निरीक्षकांव्यतिरिक्त कोणालाही मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई आहे.

ईटीपीबीएमएसशी जोडलेले रिटर्निंग ऑफिसर, सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर आणि मतमोजणी पर्यवेक्षकच ईटीपीबीएमएस सिस्टम उघडण्यासाठी ओटीपीसाठी मोबाइल घेऊ शकतील आणि त्यानंतर ते मोबाइल बंद करून निरीक्षक, रिटर्निंग ऑफिसर आणि सहाय्यक यांच्याकडे जमा करतील.

राजस्थानातील मतमोजणीच्या तयारीबाबत मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता म्हणाले की, राज्यातील १९९ विधानसभा मतदारसंघांसाठी ३३ जिल्हा मुख्यालयातील ३६ केंद्रांवर ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी ११२१ एआरओ तैनात करण्यात आले आहेत. जयपूर, जोधपूर आणि नागौरमधील प्रत्येकी दोन केंद्रांवर आणि उर्वरित ३० निवडणूक जिल्ह्यांमधील प्रत्येकी एका केंद्रावर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR