26.1 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeपरभणीपोलिस भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण

पोलिस भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण

परभणी : जिल्हा पोलिस दलांतर्गत शिपाई पदाच्या १११ जागांकरीता ६ हजार ४६४ व चालकांच्या ३० पदांसाठी ४ हजार ५४० अर्ज दाखल झाले आहेत. पोलिस शिपाई व चालक या दोन पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रीडा संकुलात होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. दि. १९ जूनपासून ही प्रक्रिया सुरु होणार असून पहिल्या टप्प्यात शारिरीक चाचणी तर दुस-या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रविंंद्रसिंह परदेशी यांनी दिली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवार, दि. १७ पोलिस दलातील शिपाई व चालक या दोन पदांसाठीच्या भरतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पोलिस दलांतर्गत शिपाई या पदाच्या एकूण १११ जागा रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने ६ हजार ४६४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १ हजार ४६७ अर्ज महिला उमेदवारांचे आहेत. तर ४ हजार ९९७ अर्ज हे पुरुष उमेदवारांंचे आहेत. चालकांच्या ३० जागांसाठी ४ हजार ५४० अर्ज दाखल झाले असून त्यात १९२ अर्ज हे महिलांचे आहेत व ४ हजार ३४८ अर्ज हे पुरुषांचे असल्याचे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी सांगितले.

शिपाई व चालक पदासाठीची भरतीची प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असणार आहे. यात कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये किंवा गैरप्रकाराचे प्रयत्न करु नयेत, असा इशारा पोलिस अधिक्षक परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिला. संपूर्ण भरतीची प्रक्रिया ही अत्यंत सुरळीत, पूर्णत: पारदर्शक पध्दतीने आणि गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असे पोलिस अधीक्षक परदेशी यावेळी म्हणाले.

विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी येणा-यांनी पर्यायी रस्ते वापरावेत
शहरातील कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात १९ जूनपासून होणा‍-या पोलिस भरती प्रक्रिये दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी येणा-या नागरिकांना जिल्हा पोलिस दलाने त्या काळापुरती मनाई केली आहे. नागरिकांनी सायाळा व बलसाकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR