नवी दिल्ली : ज्या निर्र्दयीपणे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, इतक्या निर्र्दयीपणे इंग्रजांनीदेखील स्वातंर्त्यसैनिकांना मारहाण केली नसेल, अशी टीका आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपात जनरल डायरने जन्म घेतला असावा असा घणाघातही केजरीवाल यांनी केला.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, काल मोदी सरकारने आपल्या देशातील मुलांवर आणि तरुणांवर ज्या प्रकारे अमानुष अत्याचार केला तसे दृश्य देशाच्या इतिहासात कधीच पाहायला मिळाले नाही. माझ्या मते, या बाबतीत मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकले आहे. इंग्रजांनीदेखील कदाचित स्वातंर्त्यसैनिकांवर इतक्या निर्दयीपणे लाठीचार्ज केला नसेल किंवा असा हल्ला केला नसेल. पण मोदी सरकारने आपल्या देशातीलाातील स्वत:च्याच मुलांवर आणि तरुणांवर हल्ला केला आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हीडीओ फिरत आहेत. अनेक व्हीडीओंमध्ये मुले पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत. अनेक व्हीडीओमध्ये मुली पोलिसांसमोर गयावया करत आहेत, हात जोडत आहेत. तरीही पोलिस त्यांना सातत्याने मारहाण करत आहेत. काही व्हीडीओंमध्ये नि:शस्त्र मुलांवर कोणत्याही कारणाशिवाय लाठीचार्ज होताना दिसत आहे. मी स्वत: असा एक व्हीडीओ पाहिला, ज्यामध्ये दोन-तीन पोलिस उभे होते आणि तिथून जाणा-या प्रत्येक मुलाला लाठ्या मारत होते. ती मुले काहीच करत नव्हती, कोणावरही हल्ला करत नव्हती. तरीही त्यांच्यावर लाठीचार्ज सुरू होता.
खोटे गुन्हे दाखल
अनेक ठिकाणी लाठीचार्जची कोणतीही गरज नसताना कारवाई करण्यात आली. एका ठिकाणी काही मुले बसली असताना त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. कालच्या आंदोलनानंतर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर अनेक पालक लिहित आहेत की, त्यांची मुले बेपत्ता झाली आहेत. त्यांचा काहीच पत्ता लागत नाही. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन एखाद्या तुरुंगात किंवा इतरत्र नेले असावे अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. पण त्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही असे केजरीवाल म्हणाले. आजपर्यंत इतकी क्रूरता कधीच पाहायला मिळाली नव्हती. जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायरने जे केले होते, त्यालाही मोदींनी मागे टाकले आहे असे वाटते. काही लोक तर म्हणत आहेत की, जनरल डायरचा आत्माच मोदींंच्या रूपात पुन्हा जन्माला आला आहे असा घणाघाती अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
















