छ. संभाजीनगर : शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांसाठी लढेन. त्यांच्या आरक्षणात खोडा घालणा-यांचा ‘योग्य’ कार्यक्रम टप्प्यात येताच करेल, अशी ग्वाही मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (ता. २१) येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेदहाला मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की माझी तब्येत ठीक नसतानाही मी २४ तास मराठा समाजबांधवांच्या भेटी घेऊन आपली एकी राखण्यासाठी आवाहन करीत आहे. ३२ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून, आता एक कोटी मराठा समाजबांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आरक्षण आपल्या जवळ आले आहे. त्यामुळे मराठ्यांची वज्रमूठ एक ठेवा, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.
आपल्याला लक्ष्य करणा-या काहींनी कशाकशात लाभ उठवले, ही मी सांगण्याची गरज नसून त्यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे असून, वेळ येताच कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, अशी मी ग्वाही देतो. सध्या फक्त आरक्षण हाच विषय असल्याने उद्याच्या सभेत मी सगळे सविस्तर सांगेन, असेही ते म्हणाले.
आज या सभेत येताना पहिली वेळ अशी आली, की मला स्टेजवरून खाली येऊन जागा करावी लागली व शांतता करावी लागली. मी तुमच्या बळावर लढाई लढत असताना अशी ढकला ढकलीची वेळ आणणे गैर आहे.
आयोजकांना सुनावले खडेबोल
सभेसाठी आठची वेळ देण्यात आली होती. तोपर्यंत खेड्यापाड्यांतून स्त्री-पुरुष हजर होते. जरांगे-पाटील स्टेजवर येताना त्या भागात रेटारेटी झाल्याने आयोजकांना त्यांनी खडेबोल सुनावले. स्टेजवर जरांगे-पाटलांशिवाय एकाही व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी लोकांनी मनाई केली. उशीर झाल्याने कार्यक्रम जरांगे पाटलांच्या भाषणाने सुरू झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. एका मुलीच्या हस्ते त्यांना तलवार देण्यात आली.