मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये उग्र स्वरूप धारण केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हिंसक आंदोलनामुळे झालेली परिस्थिती निवळत असतानाच आता मुंबईत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आंदोलकांनी बुधवारी सकाळी आकाशवाणी येथील आमदार निवासाच्या बाहेर उभ्या असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.
तीन तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या. आमदार निवासाचा परिसर हा मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे आता या परिसरातही मराठा आंदोलनाचा भडका उडू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणारे तिघेही छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे आहेत. या तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानपुरे अशी आहेत. या तिघांना मरिनड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर कागलमध्येही हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणा-या गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर संबंधित आंदोलकांच्या सुटकेसाठी मराठा संघटनांच्या माध्यमातून पोलिस ठाण्यात वकील पाठवण्यात आले होते.
मुंबईत मंत्रालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. मंत्रालयाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटच्याच बाजूला आमदार निवास आहे. या आमदार निवासच्या खाली मंत्री हसन मुश्रीफांची गाडी उभी होती. आंदोलकांनी मुश्रीफांची गाडी हेरून तिची तोडफोड केली आहे. मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात आता पोलिस फौजफाटा वाढवण्यात आला आहे.