नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ई २० पेट्रोलच्या सक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ई २० शी सुसंगत नसलेल्या वाहनांवर ई २० पेट्रोलची सक्ती केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सरकारने हा या निर्णया पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रात केजरीवाल यांनी म्हटले आहे की, ई २० पेट्रोलबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. मात्र, नागरिकांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी सरकारमधील मंत्री आंदोलन करणा-यांना राष्ट्रविरोधी, बेरोजगार सामाजिक कार्यकर्ते आणि लॉबिस्ट अशा शब्दांत हिणवत आहेत. ई २० पेट्रोलची सक्ती करण्यामागे कोणतेही तर्कसंगत, वैज्ञानिक, अभियांत्रिकी किंवा आर्थिक कारण नाही. त्यामुळे या निर्णयामागे जनहितापेक्षा इतर काही हितसंबंध असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.
३० कोटी वाहने ई २० सुसंगत नाहीत
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, २०२३ पूर्वी उत्पादित झालेली देशातील जवळपास ३० कोटी दुचाकी आणि चारचाकी वाहने ई २० पेट्रोलसाठी सुसंगत नाहीत. या वाहनांच्या उत्पादकांनीही वाहनांमध्ये शुद्ध पेट्रोल किंवा काही प्रकरणांमध्ये ई १० पेट्रोल वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ई २० पेट्रोलची सक्ती झाल्यामुळे वाहनधारकांना कमी मायलेज, इंजिन व इंधन प्रणालीची झपाट्याने झीज आणि महत्त्वाच्या सुट्या भागांचे नुकसान सहन करावे लागत असल्याचा त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी काही पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केल्याचा उल्लेख केला असून सोशल मीडियावरही अशाच तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दोन महत्त्वाच्या मागण्या
केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. पेट्रोल पंपांवर ग्राहकांना शुद्ध पेट्रोल आणि ई २० पेट्रोल या दोन्ही पर्यायांची उपलब्धता करून द्यावी, जेणेकरून ई २० सुसंगत नसलेल्या वाहनधारकांवर सक्ती होणार नाही. ई २० पेट्रोलचे उष्मांक मूल्य कमी असल्याने आणि त्यातून कमी मायलेज मिळत असल्याने ई २० पेट्रोलची किंमत कमी करावी, जेणेकरून नागरिकांना दर्जात तडजोड झालेल्या इंधनासाठी पूर्ण किंमत मोजावी लागणार नाही.
पंतप्रधानांकडे भेटीची मागणी
या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ द्यावा, अशी विनंतीही केजरीवाल यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. ई २० पेट्रोलबाबत नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष मांडण्यासाठी भेटीची संधी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
















