परभणी : शहरातील पाथरी रस्त्यावरील जुना पेडगांव रोडवरील लक्ष्मी नगरात गेल्या २३ वर्षापासून रस्ते, नाल्या व मुलभुत सुविधांचा अभाव आहे. या पार्श्वभुमिवर आज सोमवार, दि.४ डिसेंबर रोजी लक्ष्मी नगरातुन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारो नागरीकांचा सहभाग असलेला हा मोर्चा मनपावर धडकला.
पेडगाव रस्त्यावरील लक्ष्मी नगरातील रहिवासी असलेले नागरीक गेल्या २३ वर्षापासून मालमत्ता कर, नळ पट्टी व विविध करभरणा करत आहेत.
परंतू या ठिकाणच्या नागरीकांना रस्ते, नाल्या व विविध मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही मुलभूत सुविधा पुरवण्यात येत नसल्याने या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात लक्ष्मी नगर मारोती मंदिरापासुन सुरुवात झाली. हा मोर्चा शहरातील जुना पेडगांव रोड मार्गाने रायगड कॉर्नर, दर्गाह कमान, उड्डानपुल, बस स्थानक, रेल्वे स्टेशन मार्गाने महानगर पालिकावर धडकला. या मोर्चात लक्ष्मी नगरातील नागरीक, युवक व महिला मोठया संख्येने सहभागी झाले होते.