जिंतूर : महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे गोवा येथे होणा-या मर्यादित २० षटकांच्या क्रिकेअ स्पर्धेसाठी तब्बल ९०० क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. यात १८ खेळाडूची निवड करण्यात आली. यात तालुक्यातील पुंगळा येथील सर्व सामान्य कुटुंबातील नवनाथ लाटे या ऑलराऊंडर खेळाडूचा देखील समावेश करण्यात आल्याने या खेळाडूंवर सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया (मर्यादित २० षटकांच्या स्पर्धेसाठी) दि.११ फेब्रुवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या भव्य मैदानावर महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. यात तब्बल उत्कृष्ट क्रिकेट खेळणा-या ९०० खेळाडूंनी क्रिकेट चाचणीत सहभाग नोंदवून आपल्या खेळाचे कौशल्य दाखविले होते. त्यापैकी १८ क्रिकेट खेळाडूची निवड दि.१२ फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आली.
या निवड यादीत तालुक्यातील पुंगळा येथील क्रिकेट खेळाडू नवनाथ चंद्रकांत लाटे (वय २६ वर्षे) या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण करत आपली छाप पाडल्याने ऑलराऊंडर खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या संदर्भात २६ फेब्रुवारी रोजी त्याला लेखी पत्र देण्यात आले असून दि.२२ ते २५ एप्रिल मडगाव (गोवा) येथे होणा-या ऑल इंडिया नॅशनल गोवा टी २० चॅम्पनीयनशिपसाठी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धात महाराष्ट्र संघासह इतर ७ राज्यातील क्रिकेट संघात विविध सामने होणार आहे. नवनाथ लाटे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात वाणिज्य विभागात पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील त्यांनी घवघवीत यश संपादित केल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करण्याचे लक्ष
परभणी जिल्ह्यातून एकमेव खेळाडू म्हणून निवड झाल्याने एकमत प्रतिनिधी शेख अलीम यांनी नवनाथ लाटे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की माझे आई वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी आयुष्यभर खूप कष्ट घेतले. त्यामुळे आईवडिलांचे पारणे कसे फेडावे म्हणून मी शिक्षणा सोबत क्रिकेट खेळात अथक परिश्रम घेतले. यापुर्वी देखील विविध स्पर्धात मी दमदार क्रिकेट खेळी खेळलो आहे. आता गोवा स्पर्धेत उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करून देश पातळीवरील खेळण्याचे लक्ष एकच आहे असे सांगितले.