36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीएआरटीओ कार्यालयात अडीच वर्षात एसीबीचे तीन ट्रॅप

एआरटीओ कार्यालयात अडीच वर्षात एसीबीचे तीन ट्रॅप

परभणी : येथील उपप्रादेशिक परीवहन कार्यालयात कच्चे परमीट देण्यासाठी २ हजार रूपयांची लाच स्विकारताना एका खाजगी इसमास रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणी एआरटीओ कार्यालयातील वरीष्ठ लिपीक गणेश टाक यांच्यासह खाजगी इसम मोहम्मद मसुद मोहम्मद रशीद या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. या दोघांनाही मंगळवार, दि.२७ रोजी न्यायालयात हजर केले असता दोघांनाही १ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान उपप्रादेशिक परीवहन अधिकारी पदावर श्रीमती अश्विनी स्वामी रूजू झाल्यापासून गेल्या २ वर्षाच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ३ सापळा कारवाई यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालयातील गैरव्यवहार वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. एसीबीच्या कारवायामुळे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असूनही वरीष्ठ अधिकारी मात्र श्रीमती स्वामी यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरीकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

येथील एआरटीओ कार्यालयात १० ऑक्टोबर २०२१ रोजी उपप्रादेशिक परीवहन अधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी स्वामी रूजू झाल्या. त्या रूजू झाल्यानंतर अवघ्या ३७ दिवसानंतर नांदेड एसीबीने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी केलेल्या कारवाईत एआरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक नागनाथ महाजन व खाजगी इसम अनिस खान गुलाम दस्तगीर खान या दोघांना ६ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर एआरटीओ कार्यालयाचा कारभार श्रीमती स्वामी सुधारतील अशी अपेक्षा होती. परंतू एआरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार आणखीनच बोकाळला असल्याचे दिसून येत होते. याच पार्श्वभुमीवर पुणे येथील एसीबी पथकाने ३० जून २०२२ रोजी सापळा कारवाई केली. यात एआरटीओ कार्यालयातील कनिष्ठ लिपीक अल्ताफ खान कलंदर खान पठाण यास ४० हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या दोन कारवायांमुळे उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाचा संपूर्ण कारभार चव्हाट्यावर आलेला असताना जालना एसीबीने दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेल्या सापळा कारवाईत वरीष्ठ लिपीक गणेश टाक व खाजगी इसम मोहम्मद मसुद मोहम्मद रशीद या दोघांना २ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. श्रीमती स्वामी यांच्या २ वर्ष ५ महिन्याच्या कार्यकाळात एसीबी पथकाने ३ सापळा कारवाई केल्या आहेत. या तीन्ही कारवाईत एआरटीओ कार्यालयातील ३ कर्मचा-यांसह खाजगी इसमांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. परंतू परीवहन आयुक्त विवेक भिमनवार, प्रधान सचिव पराग जैन, नांदेड आरटीओ कामत यांनी मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून श्रीमती स्वामी यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असताना त्यांना पाठीशी घातले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकत्याच एसीबीने केलेल्या कारवाईची दखल घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परीवहन खात्याकडून तसेच वरीष्ठ अधिका-यांकडून श्रीमती स्वामी यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल आता नागरीकातून विचारला जात आहे.

सहा.मोटार वाहन निरीक्षकावर पोक्सोचा गुन्हा
येथील उपप्रादेशिक परीवहन कार्यालय एसीबीच्या कारवायांनी चर्चेत असतानाच येथील सहा. मोटार निरीक्षक अक्षय माळवे यांच्यावर परभणी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यातंर्गत पोक्सो अंतर्गत १७ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर माळवे यांना उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्रीमती अश्विनी स्वामी यांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. परंतू या प्रकरणातील पिडीतांनी श्रीमती स्वामी यांच्या दबावाला न जुमानल्याने हे प्रकरण सध्या न्यालयात प्रविष्ट आहे.

एआरटीओ स्वामी यांच्यावर फेकली होती शाई
येथील उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या मनमानी कारभाला अनेक नागरीक वैतागले आहेत. या प्रकरणी श्रीमती स्वामी यांना भेटून नागरीकांनी ३ ते ४ वेळा निवेदन देवून खाजगी इसमांचा कार्यालयातील वावर थांबवावा तसेच कागदपत्रे गहाळ होत असल्याची तक्रार केली होती. परंतू श्रीमती स्वामी यांनी याकडे लक्ष दिल्याने या सर्व कारभाराला कंटाळून काही इसमांनी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीमती स्वामी यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकरणी संबंधीत शाई फेक करणा-यांवर ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतू श्रीमती स्वामी यांच्या कारभारात शाईफेक प्रकरणानंतर देखील थोडीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR