मुंबई/रायगड: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकण, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि घाटमाथा परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते पाण्याखाली जाणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटनांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर खळबळ; चालक १०-१२ तासांपासून अडकले
चिपळूणजवळील खवटी परिसरात महामार्गावर मोठी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटेपासून प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू असले, तरी सततचा पाऊस आणि खराब हवामानामुळे कामात मोठे अडथळे येत आहेत. दरम्यान, परशुराम घाट परिसरातील ओमेगा हॉटेललगतच्या डोंगरातून माती आणि मोठे दगड खाली येत असल्याने येथेही मोठी दरड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. खबरदारी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महामार्गावरील या खोळंब्यामुळे प्रवासी गेल्या १० ते १२ तासांपासून जागच्या जागी अडकून पडले असून, त्यांना अन्न, पाणी आणि इंधनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
खोपोली-पेण महामार्ग बंद; सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खोपोली-पेण महामार्गही पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाटा दरम्यान रस्ता जलमय झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे परिसरातील चिंता आणखी वाढली आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी शहरातील काही बाजारपेठा आणि आजूबाजूच्या शेतात घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नदीकाठच्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ला फटका
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पालाही या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. प्रकल्पातील एका भागाचा स्लॅब खचल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी आणि माती आत शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोणावळा आणि घाटमाथा परिसरात आणखी पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई-पुणे एक्सप्रेसवे किंवा जुना महामार्ग न वापरण्याचे आवाहन केले आहे. काही रेल्वे मार्गांवरही दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
साताऱ्यात मोठी दुर्घटना; बारामतीच्या चालकाचा जागीच मृत्यू
सातारा जिल्ह्यातील फलटण-पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात डोंगरावरील एक मोठा दगड चालत्या कारवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दगड सैल होऊन गाडीच्या पुढील काचेवर आदळला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या दिशादर्शक फलकावर जाऊन जोरात धडकली. या भीषण दुर्घटनेत चालक योगेश पोपट जगताप (वय ३८, रा. आंबे खुर्द, बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
















