अयोध्या : वृत्तसंस्था
७ हजारांवर निमंत्रित पाहुणे, विदेशातील प्रतिष्ठित व्यक्ती, संत-महंतांच्या उपस्थितीत रंगरंगोटी, रोषणाई, भगव्या पताका, गळ््यात भगवे वस्त्र, श्रीरामाचे भव्यदिव्य कटआऊट आणि जय श्रीरामचा जयघोष यामुळे राममय झालेल्या अयोध्या नगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुचर्चित रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हिरे, मोती, सोन्याचे अलंकार आणि फुलांच्या सजावटीने नटलेल्या कोदंडधारी रामाच्या बालरूपातील मूर्तीने सर्वांनाच भुरळ घातली. या सोहळ््यानिमित्त देशभरात रामनामाचा जप आणि जयघोष पाहायला मिळाला. यावेळी मोदी यांनी राम मंदिर आणि देशाचा विकास याची सांगड घालत अयोध्येतील राम मंदिर हे राष्ट्र चैतन्याचे प्रतिक असल्याचे सांगितले. तसेच राम मंदिरानंतर पुढे काय, याला उत्तर देताना देशात १ कोटी घरांवर सोलर पॅनल बसविण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या या ऐतिहासिक सोहळ््याला सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित साधू, संत, निमंत्रितांशी आणि देशवासीयांशी संवाद साधला. त्यांनी आजच्या सोहळ््याच्या सगळ््यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सियावर रामचंद्र की जय असा जयघोष आणि सर्वांना रामराम करीत आज शतकांच्या प्रतीक्षेनंतर शतकाच्या अभूतपूर्व धैर्य अगणित बलिदान, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत, असे म्हटले.
मी आताच अयोध्येतील मंदिराच्या गाभा-यातून ईश्वरच्या चेतनेचा साक्षीदार होऊन तुमच्यासमोर उभा राहिलो आहे. आजचा जो क्षण आहे, त्याबाबत अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण कंठ दाटून येत आहे. मन अजूनही त्या क्षणांत लीन आहे. आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत तर आता दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे, मी जो अनुभव घेतला, त्याची अनुभूती देशातील विश्वाच्या कोप-यातील रामभक्तांना होत असेल. हा क्षण अलौकीक आहे. आजचा क्षण पवित्र आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी २२ जानेवारी २०२४ चा हा सूर्य अद्भूत आभा घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवरील तारीख नाही. ही एका नव्या कालचक्राची सुरुवात आहे. राम मंदिराच्या भूमीपूजनानंतर प्रत्येक दिवस संपूर्ण देशात उमंग आणि उत्साह वाढवत होता. आज त्या उत्साहाचे रुप मी समोरही पाहात आहे. श्रीरामाच्या मंदिराचे बांधकाम हे भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. या बांधकामामुळे आगीला नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नसून ते भारताच्या दृष्टीचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताचे मार्गदर्शक आणि रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे, असे मोदी यांनी सांगितले.
हीच राष्ट्र निर्माणाची पायरी
आजपासून आपल्याला पुढील १००० वर्षांपर्यंत पाया रचायचा आहे. मंदिर निर्माणापासून पुढे होत देशवासीय भव्य आणि दिव्य भारत निर्माणाची शपथ घेत आहेत. रामाचे विचार मनासह जनमनातही असे पाहिजेत. हीच राष्ट्र निर्माणाची पायरी आहे. आपल्या भारतीयांत हनुमानाची भक्ती, सेवा आणि समर्पण हे गुण आहेत. हेच विचार देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र घडवण्यासाठी आधार देतील, असे पंतप्रधान सांगितले.
आता नवराष्ट्र निर्मिती होणार
आपल्या अनेक पिढ्यांनी जे धैर्य दाखवले, त्या धैर्याचा वारसा आज आपल्याला मिळाला आहे. गुलामीची मानसिकता तोडून आपण नवराष्ट्र निर्मिती करत आहोत. अशाच प्रकारे नवा इतिहास लिहिला जातो. आजपासून एक हजार वर्षांनीही आजचीही तारीख लक्षात ठेवतील. ही रामाचीच कृपा आहे. ही वेळ सामान्य नाही. कालचक्रावर केलेली स्मृतीची अमिट स्मृती आहे. त्यामुळे आता नवराष्ट्र निर्मिती होणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
अनुष्ठान उपवास सोडला
प्राणप्रतिष्ठापना सोहळ््यानिमित्त पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान केले होते. या कालावधीत त्यांनी ११ दिवस उपवास केला होता. यात जमिनीवर झोपणे, गायींना चारा खाऊ घालणे, मंदिरांना भेट देणे अशी कामे त्यांनी केली. आज प्राणप्रतिष्ठाणपना सोहळ््यानंतर मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हातून प्रभू रामाचा चरणामृत प्राशन करून आपला उपवास सोडला.