मुंबई : महायुतीच्या जागावाटपात आरपीआय नेते रामदास आठवले अद्यापही वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. यावरून महायुतीला रामदास ‘आठवले’च नाहीत असा कयास राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात बोलताना आठवले यांनी एका बाजूला नाराजी व्यक्त केली आहे, तर दुस-या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, तसेच धारावी किंवा चेंबूरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे लागेल, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत असे सांगितले असल्याचे, म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवसच शिल्लक उरले आहेत.
आठवले म्हणाले, मी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला १०-२० जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांनाही रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे. असे असतानाही महायुतीच्या नेत्यांनी गांभीर्याने आमचा विचार केला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आमची यादी त्यांना दिली होती आणि कोणता तरी थोडासा त्याग करणे त्यांनी आवश्यक होते.
आम्ही जर एवढा त्याग करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचे काम चालली आहे. म्हणून महायुतीसोबत राहायला हवे, अशी आमची भूमिका आहे. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीसोबत आहोत असे असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू
रिपब्लिकन पक्षाला एक जनाधार आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी माझ्यासोबत आहे. पण आता मी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर, त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर आणखी एक-दोन तरी जागा मिळाव्या, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला आहे. त्यात धारावीकिंवा चेंबूरची जी जागा आहे, ती आम्हाला देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात, मी मुख्यमंर्त्यांसोबत बोलतो, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
आठवले यांच्या काय मागण्या?
याशिवाय, आम्ही फडणवीसांकडे मागणी केली आहे, दोन जागा विधानसभेच्या. एक एमएलसी, सरकार आल्यानंतर दोन-तीन महामंडळांची अध्यक्षपदे, तीन-चार उपाध्यक्षपदे, तसेच जिल्हा तालुक्यातील ज्या सरकारी समित्या आहेत त्यांत रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळायला हवे. याशिवाय, आगामी महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्यांतही रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्यायला हव्यात. अशी मागणीही रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.