21.6 C
Latur
Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपमध्ये बंडाळी, सागर बंगल्यावर नाराजांची लाट

भाजपमध्ये बंडाळी, सागर बंगल्यावर नाराजांची लाट

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आता बंडखोरी उफाळून आली आहे. अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना कायम ठेवण्यात आल्याने इच्छुकांची नाराजी वाढली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे. सांगलीत विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर होताच आता त्यांच्या उमेदवारीला विरोध करीत शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे मुंबईत भाजपकडून पहिल्या यादीत १४ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कुलाबा मतदारसंघातून पुन्हा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला राज पुरोहित यांनी विरोध केला आहे.

राज पुरोहित आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे राज पुरोहित बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. २०१९ मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कट करत भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांना दुस-यांदा याच मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले राज पुरोहित देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

आज सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपमधील नाराजांची ये-जा सुरु होती. खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीरसुद्धा भेटीला पोहोचले. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक बाळा भेगडे हेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शेवटच्या क्षणी पक्षादेशामुळे माघार घ्यायला लावलेले मुरजी पटेल हेदेखील आज सकाळी फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. मुरजी पटेल अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. वर्सोवा मतदारसंघ वेट अ‍ँड वॉचवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या.

सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजप नेते इच्छुक उमेदवार शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. गेली १० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहूनही अन्याय केल्याचा आरोप शिवाजी डोंगरे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन उमेदवारी डावलली असून सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी अमान्य करीत मी बंडखोरी करीत असल्याचे जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR