22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रअजितदादांना विरोध करा, पण भाषेवर नियंत्रण ठेवा

अजितदादांना विरोध करा, पण भाषेवर नियंत्रण ठेवा

भुजबळांचा पवार कुटुंबीयांना सल्ला

नाशिक : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुटुबीयांना विरोध करायचा असेल, तर तो जरूर करावा, परंतु भाषेवर थोडेसे नियंत्रण ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे. कितीही भांडणे झाली तरी रक्ताची नाती काही तुटत नाहीत, असे सांगताना भुजबळांनी ठाकरे चुलत भावंडांचे उदाहरण दिले. कुठलीही अडचण आली, की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या मदतीला धावून जातात, असा दावा भुजबळांनी केला. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ बोलत होते.

अजितदादा पवार कुटुंबात एकटे पडले आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले की, खरे तर यावर भाष्य करणे योग्य होणार नाही, पण असे दिसते आहे की, अजितदादांचे बरचेसे नातेवाईक आणि भाऊ वगैरे त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. माझे एवढेच म्हणणे आहे, की तुम्हाला अजितदादांना विरोध करायचा आहे, ठीक आहे करा. कोणीतरी विरोध करतेच, कुणीही वर आले की विरोध होतोच, करा परंतु भाषेवर थोडेसे नियंत्रण ठेवा असे भुजबळ म्हणाले.

शेवटी राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिलात तरी तुमचे रक्ताचे नाते काही तुटत नाही. आज ना उद्या परत तुम्हाला कुठल्या तरी कार्यक्रमात कुटुंब म्हणून एकत्र यावेच लागणार आहे, चर्चा करावी लागणार आहे, एकमेकांचे तोंड बघावे लागणार आहे. रक्ताची नाती काही तुटत नाहीत, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR