हैदराबाद : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी रेवंत रेड्डी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी निवडणूक आश्वासन पूर्ण केले. रेड्डी यांनी निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे सर्व दरवाजे जनतेसाठी खुले राहतील असे आश्वासन दिले होते. आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयासमोर (प्रगती भवन) लावलेले लोखंडी बॅरिकेड्स हटविले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक बुलडोझर, ट्रॅक्टर आणि मजूर घराबाहेर बॅरिकेड्स हटवण्यासाठी पोहोचले होते.
तसेच काँग्रेसने तेलंगणातील जनतेला दिलेली ५ हमींच्या पैकी पहिली हमी शनिवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. काँग्रेसने महिला केंद्रीत कल्याण कार्यक्रमांतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये, गॅस सिलिंडर ५०० रुपये आणि सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवास दिला जाईल, अशी हमी दिली होती. तसेच १० लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासनही दिले आहे. जमीन आणि घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये आणि गृह ज्योती योजनेंतर्गत पात्र घरांना २०० युनिट मोफत वीज दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.