रेणापूर : प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावरील लखमापूर पाटी येथे मंगळवारी दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत तब्बल ५ तास बैलगाड्यासह रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . विशेषत: या आंदोलनात महिलाची संख्या लक्षणीय होती . मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तसेच मनोज जरांगे हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत. दिवसे दिवस त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र सरकार याकडे लक्ष न देता ठोस भूमिका घेत नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
जरांगे यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाच्या वतीने पांिठबा म्हणून लखमापुर, पळशी, मोटेगाव, मोरवड, बिटरगाव, वाला, तत्तापूर, बावची, सांगवी, कुंभारी, ईटी, खानापूर, भोकरंबा, चाडगाव या गावासह अन्य गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी आंदोलनस्थळी तहसिलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यानी निवेदन स्वीकारून आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवल्या जातील, असे सांगितले. या रस्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय मार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प होऊन वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनादरम्यान पोलीस उप अधीक्षक अनिकेतन कदम यांनी भेट दिली तर पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपनिरीक्षक मानुल्ला शेख यांनी आंदोलना दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.