मॉस्को : रशियामध्ये रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाचा किनारा होता. यामुळे कामचटका भागात शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. भूकंपाची तीव्रता ७ एवढी असल्याने अमेरिकेने त्सुनामीचा इशारा दिला आहे.
रशियातील टीएएसएस वृत्तसंस्थेने रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या सुदूर पूर्व शाखेच्या ज्वालामुखी आणि भूकंपविज्ञान संस्थेचा हवाला देऊन म्हटले आहे की, ज्वालामुखीने राख आणि लावा सोडण्यास सुरुवात केली होती. अहवालात शास्त्रज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शिवलुच ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला आहे, व्हिज्युअल मूल्यांकनानुसार राखेचा प्लम समुद्रसपाटीपासून आठ किलोमीटर उंच होत आहे.
त्सुनामीचा इशारा
अमेरिकेच्या नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने भूकंपामुळे त्सुनामीचा धोका असल्याचे म्हटले होते. परंतु रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या कामचटका शाखेने त्सुनामीचा धोका नसल्याचे सांगितले.