जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा पत्नी सारासोबत घटस्फोट झाला आहे. सचिन पायलट यांनी मंगळवारी टोंक विधानसभेच्या उमेदवारीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. पत्नीच्या नावापुढे दिलेल्या कॉलममध्ये त्यांनी ‘घटस्फोटित’ असे लिहिले आहे. तर पत्नीशी संबंधित इतर सर्व रकान्यांमध्येही ‘लागू नाही’ असे लिहिले आहे. मात्र, त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन्ही मुलांची नावे लिहिली आहेत. सचिन पायलट यांनी २०१८ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी सारा पायलटचे नाव लिहिले होते.
मात्र, दोघांमध्ये घटस्फोट कधी झाला, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण हे दोघे वेगळे झाल्याचे पहिल्यांदाच जाहीरपणे समोर आले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात पायलट यांनी पत्नीचे नाव असलेल्या कॉलमसमोर ‘घटस्फोट’ असे लिहिले आहे. सचिन आणि सारा यांना दोन मुले आहेत. सचिन पायलट आणि सारा पायलट यांनी २००४ मध्ये लग्न केले होते. सारा या जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांची मुलगी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फारुख अब्दुल्ला यांचा या लग्नाला विरोध होता तर पायलट यांचे कुटुंबही या नात्यावर सुरवातीला नाराज होते. फारुख अब्दुल्ला या लग्नाला उपस्थित राहिले नव्हते. सारा यांचे शिक्षण लंडनमध्ये झाले आहे. या दोघांचे लग्न तत्कालीन दौसाचे खासदार आणि सचिन यांच्या आई रमा पायलट यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाले होते.