संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या रविवारी हे प्रकरण इतके तापले की हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाला. यातच आता भाजप आमदार शलभमणी त्रिपाठी यांनी या शाही जामा मशिदीसंदर्भात नवा दावा केला आहे. २०१२ पूर्वी येथे जामा मशीद नवही, तर हरी मंदिर होते. तेथे पूजाही होत होती. तेथे हिंदूंचे विवाह सोहळेही होत होते, असा दावा शलभमणी त्रिपाठी यांनी केला आहे. एवढेच नाही तर, संभलचे माजी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या दबावामुळे येथील पूजा थांबवण्यात आल्याचा दावाही शलभामणी यांनी केला आहे.
यासंदर्भात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चार फोटो शेअर करत शालभमणीने यांनी लिहिले की, २०१२ पर्यंत म्हणजेच सपा सरकारच्या आधी हरी मंदिरात पूजा होत होती. लग्नाचे विधीही पार पडत होते, त्याची जुनी छायाचित्रे आहेत, सपा सरकारमध्ये खासदार शफीकुर्रहमान बर्क यांच्या दबावामुळे, येथील पूजा-अर्चना बंद करण्यात आली. हरी मंदिराचे पूर्णपणे जामा मशिदीत रूपांतर करण्यात आले. शलभमणी यांनी आपल्या पोस्टसोबत चार फोटोही शेअर केले आहेत. यांपैकी दोन फोटो एका हिंदू कुटुंबाच्या लग्नाचे आहेत. याशिवाय इतरही दोन फोटो आहेत.
शांतता राखण्याचे निर्देश
शलभमणी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर शाही मशीद आणि हरी मंदिरासंदर्भात पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने या मशिदीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करत दिवाणी न्यायालयाला पुढील कारवाई करण्यापासून रोखले आहे. याच बरोबर उत्तर प्रदेश सरकारला येथे शांतता राखण्याचे निर्देशही दिले आहेत.