नागपूर : राज्यासह संपूर्ण देश हादरवणा-या नागपुरातील सना खान हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सना खान यांच्याकडे तीन मोबाईल फोन होते, त्यातील फक्त एकच मोबाईल पोलिसांना सापडला आहे, असा खळबळजनक दावा सना खान यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच, सना खान यांचे इतर दोन फोन आरोपींनी लपवून ठेवले आहेत, ते दोन फोन पोलिसांनी शोधावेत, अशी मागणीही सना खान यांच्या आईने केली आहे.
भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांचा एक मोबाईल फोन शोधण्यात नुकतेच नागपूर पोलिसांना यश आले आहे. मात्र, सना खान यांचे आणखी इतर दोन मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केलेले नाहीत. ते त्यांनी कुठेतरी लपवून ठेवले असल्याचा धक्कादायक खुलासा सना खान यांच्या आईने केला आहे. विशेष म्हणजे, सना खान हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून त्यात आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सना खान यांचे दोन मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र सना खानच्या आई मेहरून्निसा खान यांनी आरोपपत्रात नमूद गोष्टी सत्य नाहीत, त्या साफ खोट्या आहेत, असा दावा केला आहे.
आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केली असून सना खान यांचे इतर दोन्ही मोबाईल फोनही आरोपींनी अद्याप लपवून ठेवले असल्याचा आरोप करत पोलिसांनी ते शोधून काढावेत, अशी मागणी केली आहे. या प्रकरणातील आरोपी अमित साहू आणि त्याचे सहकारी पोलिसांची सतत दिशाभूल करत आहेत. अमित साहूची नार्को अॅनालिसिस चाचणी केली, तर या संदर्भातील आणखी धक्कादायक तथ्य समोर येतील, असे सना खान यांच्या आईचे म्हणणे आहे.