मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर हे एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. परंतु ब्रेकअपनंतर दोघांनी आपला वेगळा मार्ग निवडला. यातच आता शाहिद आणि करीना कपूर खान अनेक वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळाले. एका कार्यक्रमात शाहिद आणि करिनाने हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि गप्पा मारल्या.
सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यातकरिना आणि शाहिद आनंदी असल्याचे दिसत आहे. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. शनिवारी जयपूरमध्ये एक कार्यक्रमाला करीना कपूर आणि शाहिद कपूर दोघेही उपस्थित होते. ‘जब वी मेट’मधील गीत आणि आदित्य या हिट जोडीला पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही.
त्याच इव्हेंटचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये करीना कपूर कार्तिक आर्यनशी गप्पा मारत असते. त्यानंतर शाहिद कपूर तेथे येतो. करीना शाहिदकडे बघून हसत आणि त्याला मिठी मारते. ते पाहून शेजारी असलेला कार्तिक आणि क्रिती खरबंदा चकीत होतात.
शाहिद कपूर आणि करीना कपूर खान एकेकाळी दोघे एकमेकांना डेट करत होते. दोघांनी फिदा, चुप चुपके आणि जब वी मेट सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असायचे. पण काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर करीनाने सैफ अली खानशी लग्न केले, तिला दोन मुले आहेत. तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केले, त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.