30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रशांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लोकसभा लढवणार

शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लोकसभा लढवणार

महायुतीच्या अडचणी वाढल्या

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (दि. ०६) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले विजय करंजकर यांनी माघार घेत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंना पाठींबा दिला आहे. मात्र शांतीगिरी महाराज हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.

शांतीगिरी महाराज म्हणाले की, ही निवडणूक जनता जनार्दनाने हातात घेतली आहे. आम्ही ठाम निर्धार केला आहे की, नाशिक लोकसभेची निवडणूक लढवायची आणि जिंकायची. त्यामुळे नाशिकमधून माघार घेण्याचा प्रश्न संपलेला आहे, असे म्हणत शांतीगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

निवडणूक लढायची आणि जिंकायची
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला संपर्क केला होता. मंत्री गिरीश महाजन हे तुम्हाला भेटायला आले होते. याबाबत शांतीगिरी महाराज म्हणाले की, सर्वांसोबत आमच्या चर्चा झाल्या आहेत. बाबांचा दरबार सर्वांसाठीच खुला असतो. जो तो प्रत्येकाच्या इच्छेनुसार चर्चेसाठी येतो. निवडणूक लढवण्याचे नेमके कारण काय? असे विचारले असता ते म्हणाले की, ही निवडणूक जनता जनार्दनाने हाती घेतलेली आहे. जनतेनेच आम्हाला उभे केलेले आहे आणि जनतेनेच निर्धार केलाय की ही निवडणूक लढायची आणि जिंकायची, असे त्यांनी म्हटले आहे.

ही लढाई केवळ देशाच्या हितासाठी
महायुतीकडून तिकीट मिळाले अशी तुमची इच्चा होती का? याबाबत शांतिगिरी महाराज म्हणाले की, आमच्या भक्तपरिवाराने त्या पक्षाचे काम केली आहेत. त्यामुळे साहजिकच वाटत होते की, महायुतीकडून तिकीट मिळावे. मात्र शेवटी त्यांची मर्जी, असे त्यांनी म्हटले आहे. ही निवडणूक विचारांची लढाई आहे. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुध्द राजकारणाचा, असा आम्ही नारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाच्याच विरोधात नाही. ही लढाई केवळ देशाच्या हितासाठी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांचे होर्डिंग्स चर्चेत
दरम्यान, जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’ असा मजकूर शांतीगिरी महाराजांच्या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे. महायुतीकडून नाशिकसाठी तिकीट मिळावे अशी महाराजांची इच्छा होती. उमेदवारी अर्ज भरताना देखील त्यांनी एबी फॉर्म मिळाला नसताना शिवसेनेच्या नावाने तो अर्ज भरल्याने महाराजच युतीचे उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR