30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रबँकेतले ५ कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवले

बँकेतले ५ कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवले

नाशिक : खासगी बँकेत ग्राहकांनी तारण ठेवलेले २२२ लोकांचे ५ कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना नाशिकच्या गंगापूर रोड भागात घडली आहे. बँकेत असलेले सीसीटीव्ही बंद करून चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारला आहे. शनिवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका येथील इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यरत आहे. या शाखा कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे २२२ ग्राहकांची सोन्याचे दागिने ठेवले होते. चार मे रोजी बँकेचे कामकाज आटपून ग्राहकांनी दिवसभर तारण ठेवलेले सोने लॉकरमध्ये ठेवण्यास गेलेल्या बँकेच्या कर्मचा-यास लॉकरमध्ये यापूर्वी तारण ठेवलेले सोने आढळले नाही. त्याने तातडीने संबंधित व्यवस्थापक गुजराती यांना हा प्रकार सांगितला. गुजराती यांनी लॉकर मधील सोन्याचे विवरण तपासले असता लॉकरमधून ४ कोटी ९२ लाखांचे सोन्याचे विविध दागिने चोरून नेल्याचे दिसून आलेय या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोरोना काळात रुग्णालयात कर्मचा-यांकडून वापरल्या जाणा-या पांढ-या रंगाच्या सेफ्टी सुटचा एका चोरट्या कडून वापर करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटले आहे. ओळख लपवण्यासाठी दोघांपैकी एकानं पांढ-या रंगाचा कोविड सूट अंगात घातला होता. चेह-यावर मास्क आणि डोक्यावर या सूटची टोपी असल्याचे दिसते. दुस-यानं अंगात एक टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि चेह-यावर मास्क लावला आहे.

एसीच्या खिडकीतून बँकेत प्रवेश- गंगापूर रोड येथील आयसीआयसीआय बँकेची तारण शाखा एका इमारतीच्या दुस-या मजल्यावर आहे. या बँकेबाहेर २४ तास बँकेचा सुरक्षा रक्षक तैनात असतो. बँक बंद झाल्यावर अधिकृत व्यक्तीकडे असलेल्या चाव्यांशिवाय कोणी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केल्यास सायरन वाजतो. तसेच सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी दोन्ही यंत्रणा बंद करून दरोडा टाकला. बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर एसी दुरुस्तीसाठी असलेल्या खिडकीतून प्रवेश करत ही चोरी केल्याचं समोर आले आहे.

आजी -माजी कर्मचा-यांचा हात असल्याचा संशय- या चोरीमध्ये संबंधित कंपनीच्या आजी-माजी कर्मचा-यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासह आयुक्त कार्यलयातील गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितलं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR