30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeसोलापूरसोलापूर मतदार संघात बूथ यंत्रणेचे नियोजन

सोलापूर मतदार संघात बूथ यंत्रणेचे नियोजन

सोलापूर :रणजित जोशी

माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी थांबला. सोलापुरात काँग्रेसने शहर उत्तर मतदारसंघातून पदयात्रा काढली. भाजपच्या आमदारांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन बूथ यंत्रणेचे नियोजन केले. माढ्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. मोहिते पाटलांनी पंढरपूर, फलटण, माण भागात सभा घेतल्या.

सोलापूर मतदारसंघात एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. माढा मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात आहेत. सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात प्रमुख लढत होत आहे. माढ्यात भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत आहे.

या दोन्ही मतदारसंघातील लढती लक्षवेधी ठरल्या. ‘आपला विरुद्ध परका’, ‘तुम्ही काय केले, आम्ही काय केले’, ‘कुणी कुणावर अन्याय केला’, ‘सत्ता आली तर काय करणार’ अशा मुद्द्यावर उमेदवारांनी आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी सभा गाजवल्या. प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. आता राजकीय पक्षांकडून मतदान करून घेण्याची तयारी सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात सामना होत आहे. हा सामना जरी उमेदवारांमध्ये होत असला तरीही येथील निवडणूक निकालात शरद पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत माढा व सोलापूरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकच सभा होत होती. या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे सभा झाल्या आहेत.

‘आपला माणूस, आपला खासदार’ या टॅगलाईनखाली मोहिते-पाटलांनी या मतदारसंघात स्वाभिमानाची हाक दिली आहे. या मतदारसंघात मोहिते-पाटील यांना मानणारा वर्ग आहे. मोदी सरकारबद्दल या ठिकाणी मोठी नाराजी दिसत आहे. मराठा आरक्षणाचाही मोठा फॅक्टर या मतदारसंघात आहे. मोहिते-पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपने माढ्यावर विशेषता: माळशिरसवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान मोदी यांची सभा माळशिरसमध्ये घेण्यात आली.माढा लोकसभा मतदारसंघ ताब्यातून सोडण्याची भाजपची अजीबात तयारी नसल्याने या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तीक लक्ष घालून रणनिती आखली आहे. माढा मतदारसंघात मोहिते पाटलांना धोबीपछाड देण्यासाठी तमाम मोहिते पाटील विरोधकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामागे ताकद उभी केली आहे.

जिल्ह्यात पुन्हा मोहिते पाटलांचे वर्चस्व निर्माण झालेले मोहिते पाटील विरोधकांना नको असल्याने धैर्यशील मोहिते पाटलांसाठीही विजय सहजासहजी शक्य नाही. धनगर समाजाची भूमीका महत्वपुर्ण राहणार आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विरूध्द राम सातपुते अशी प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शींदे आणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात काट्याची टक्कर असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांचे केंद्रीय राजकारणात लाचिंग असल्याने या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR