40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
HomeFeaturedशरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर!

शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर!

मुंबई : शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे सूतोवाच केले होते. सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवरील अनेक बडे नेते राजधानी दिल्लीमध्ये आहेत.

राज ठाकरेही सोमवारी सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे हे आमच्या विचाराचे आहेत ते आले तर स्वागतच आहे असे जाहीर विधान केले होते. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे.

शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुली ऑफर दिली. ते म्हणाले, राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांनी थोडा विचार केला पाहिजे. भाजपला आज गरज आहे, त्यामुळेच ते सर्वांना महत्त्व देत आहेत. जेव्हा त्याची गरज नसते तेव्हा ते बाजूला करतात. हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होऊन महाराष्ट्र धर्म पाळण्याचा प्रयत्न करावा.

काय म्हणाले रोहित पवार?
मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविआ सोबत यावे ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाली आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे एनडीएमध्ये जातील?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीत सामील होणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांना एनडीएमध्ये आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरे त्यांचा पक्ष मनसेसाठी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांची मागणी करू शकतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR