जयपूर : महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. सकाळी जयपूर विमानतळावर दाखल होताच त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने पगडी घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जयपूरच्या हवा महल परिसरातून उभे असलेले योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढली. यावेळी स्थानिक मतदारांनी या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी, राजस्थान ही महा शूरवीर महाराणा प्रताप यांची पुण्यभूमी असून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो आहे. देशासह राज्याला प्रगतिपथावर न्यायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे आणि विचारांचे सरकार असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्याने आज देशात सर्वाधिक विकासप्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यामुळे राजस्थानातही डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्यास राज्याचा विकास वेगाने होईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.