30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र६७ वर्षांपासून शिरूर, मावळ महिला खासदाराच्या प्रतीक्षेत

६७ वर्षांपासून शिरूर, मावळ महिला खासदाराच्या प्रतीक्षेत

पुणे : प्रतिनिधी
देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेत. मात्र, त्या तुलनेत महिला खासदार नाहीत. शिरूर आणि मावळ (जि. पुणे) हे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाहीत. या दोन्ही ठिकाणी आतापर्यंत एकही महिला खासदार झालेली नाही. शिरूर म्हणजे २००९ पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये ६७ वर्षांत महिला खासदारच झालेली नाही.

तर, २००९ च्या पुनर्रचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या मावळमध्येही आतापर्यंतचे तिन्ही खासदार हे पुरुषच झालेले आहेत. या दोन्ही ठिकाणचे खासदार मुख्य आणि मोठ्या राजकीय पक्षांचेच राहिलेले आहेत. या ठिकाणी सेलिब्रिटी महिला नसल्याने त्या अपक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळेच शिरूरला सहा महिला अपक्षांचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

थोडक्यात युती आणि आघाडीत सामील असलेल्या आताच्या राज्यातील मुख्य आणि मोठ्या पक्षांनी व पूर्वीच्याही पक्षांनी खेडनंतर शिरूरमध्ये महिला उमेदवार देण्यात अन्याय केलेला आहे. त्याची री मावळमध्ये त्यांनी गेल्या दहा वर्षांत ओढली. एकंदरीत ही स्थिती पाहता २०२९ वा त्यानंतरच शिरूर आणि मावळमध्ये महिला खासदार होण्याची शक्यता आहे. कारण आता होऊ घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही तेथे कुणी प्रमुख उमेदवार महिला नाही. अपक्ष म्हणून त्या रिंगणात आहेत. मात्र, निवडून येण्याची त्यांची सुतराम शक्यता नाही.
सध्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत ३३ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तेथे त्यांना लोकसंख्येच्या हिशेबात नाही, पण ३३ टक्के वाटा मिळतो आहे. लोकसभेलाही तेवढाच देण्याचे बिल संसदेच्या विशेष अधिवेशनात यावर्षी पास झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी ही २०२९ पासून होणार आहे.

त्यावेळी मात्र मोठ्या राजकीय पक्षांना या दोन ठिकाणीच नाही, तर राज्यासह देशभर महिला उमेदवार द्याव्या लागणार आहेत. त्यातून मावळ आणि शिरूरला पहिली महिला खासदार होण्याची आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे महिलांशी निगडित समस्या महिला खासदार या तुलनेने अधिक प्रभावी संसदेत मांडू शकणार आहेत.

मावळमध्ये एकच महिला उमेदवार
राजकारणात महिलांना संधी देण्याची केवळ चर्चा केली जाते. देशाच्या लोकसंख्येत म्हणजे मतदारांमध्ये निम्म्या महिला आहेत. मात्र, त्या तुलनेत महिला खासदार नाहीत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये मावळमध्ये नेतृत्व करण्याची संधी महिलांना मिळालेली नाही. यंदाच्या निवडणुकीत ३३ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये फक्त एकमेव महिला उमेदवार आहे. मावळमधील महिला नेत्यांमध्ये निवडणूक लढविण्याबाबत अनास्था असल्याचे दिसून येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही फक्त एकाच महिलेला संधी दिली आहे. फक्त वंचितने माधवी जोशी यांना उमेदवारी दिली आहे.

शिरूरमध्ये तर महिला आमदारही नाही
खासदार सोडा, शिरूरमधील सहाही विधानसभा मतदारसंघात सध्या एकही महिला आमदार नाही. तर, मावळमध्ये फक्त एक आहे. त्याही गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर निवडून आलेल्या आहेत. एकही आमदार नसणे, याचा मोठ्या राजकीय पक्षांना ना खेद ना खंत आहे. त्यामुळे खासदारकीचे आरक्षण २०२९ नंतर मिळणार असले, तरी त्याचा पाया या लोकसभेनंतर होणा-या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रचला जावा, अशी महिला मतदारांची त्यातही शिरूरमध्ये मागणी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR