नवी दिल्ली : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक याने दुसरा संसार थाटला आहे. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिच्यासोबत त्याच्या नात्यात तणावाच्या चर्चा मागील १-२ वर्षांपासून सुरू होत्या. पण, दोघांकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. त्यात सानियाने काही दिवसांपूर्वी शोएबसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आणि आज अचानक क्रिकेटपटूने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले.
पाच महिने डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते.
१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये अगदीच ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले. सानियाने लग्नात तिच्या आईची लाल रंगाची साडी नेसली होती आणि शोएबने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. लग्नानंतर त्यांचं रिसेप्शन सियालकोट येथे झाले होते. लग्नाच्या ८ वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे ठेवले आहे.
पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला होता.. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात सानियाने शोएबसोबतच्या सर्व आठवणी सोशल मीडियावरून डिलीट केल्या होत्या.