मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्लाविरोधात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भारतासोबत युद्ध छेडले.
मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे कोणताही क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला यशस्वी होऊ दिलेला नाही आणि रात्रीपासूनच भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व घडामोडीदरम्यान सर्व स्तरातून जवानांचे कौतुक होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदेनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जवानांसाठी प्रार्थना केली आहे.
श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले की, आजही नेहमीप्रमाणे मी आपल्यासाठी लढणा-या शूर वीरांसाठी प्रार्थना करतो. ज्यांच्यामुळे आपण रात्री शांतपणे झोपू शकतो, नेहमीप्रमाणे कामावर जाऊ शकतो आणि आपल्या कुटुंबांसोबत राहू शकतो. माझ्या देशातील सर्व प्रभावित लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आपले सैन्य, आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत आणि आमच्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला शक्ती पाठवत आहोत. जय हिंद. अभिनेत्याच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. श्रेयस तळपदेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्याने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्थान मिळवले आहे.