भंडारा : प्रतिनिधी
भंडा-याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ८ कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर ५ कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी ९ सदस्यीय एक एसआयटी गठीत केली आहे. या एसआयटीत आयुध निर्माण कंपनीतील कुणाचाही समावेश नसल्याने ही चौकशी समिती निष्पक्षपणे चौकशी करेल, असा विश्वास निरुल हसन यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात २० वर्षीय अप्रेंटिसधारक अंकित बारई हिचा मृत्यू झाला. त्यानंतर अंकित बारईचे कुटुंबिय आक्रमक झाले. आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली. शिवाय मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बारई यांच्या कुटुंबियांनी घेतला तर आज पुन्हा संतप्त ग्रामस्थांनी आयुध निर्माण फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. साहुली गावातील २० वर्षीय अंकित बाराई या अप्रेंटिस करणा-या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-यांना अटक झाली पाहिजे, अशा घोषणा देत गावाचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी या ग्रामस्थाकडून केली जात आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीतील भीषण स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या ८ कामगारांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून आज त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. एक मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला असून उर्वरित
७ मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात आहेत.
आयुध निर्माण कंपनीतील भीषण स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळावर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक पोहोचले होते. या पथकाला बचाव कार्य करून १३ जणांना मालब्याखालून बाहेर काढले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळावर बचाव पथकाने मदत व बचावकार्य केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांचे कुटुंबीय आक्रमक
मृत कामगारांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीची मागणी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असी आक्रमक भूमिका घेतल्याने आज प्रशासनाकडून त्यांची मनधरणी करण्यात आली.