नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रालय देशातील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अनुभवाची संधी उपलब्ध करून देणार आहे. उच्च शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खास इंटर्नशिप प्रोग्राम तयार केला आहे. सध्या देशात १५० महामार्गांची कामे सुरू असून या ठिकाणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी करार करून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्याची योजना आखली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महामार्ग डिझाइन, बांधकाम प्रक्रिया, प्रकल्प नियोजन आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करीत काम करण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड
ही इंटर्नशिप एक ते सहा महिन्यांपर्यंत उपलब्ध राहणार आहे. इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांना २० हजार रूपये स्टायपेंड दिला जाईल. आयआयटी, एनआयटी आणि एआयसीटीई-मान्यताप्राप्त अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाणार आहे.

