नाशिक: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज (१० मे २०२६) नाशिकमध्ये विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर झाल्या. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली महत्त्वाची भूमिका मांडली.
नाशिकमधील ‘महाराष्ट्र पोलीस अकॅडमी’ येथे चौकशीसाठी पोहोचण्यापूर्वी चाकणकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “SIT पथकाकडून या प्रकरणाचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात पोलिसांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. ती देण्यासाठी मी आज नाशिकमध्ये आले आहे. या तपासात माझे पोलिसांना पूर्णपणे सहकार्य राहील. जे काही सत्य असेल ते लवकरच समोर येईल.”
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना चाकणकर यांनी मोठा दावा केला. अशोक खरातच्या काही बँक खात्यांशी त्यांचे नाव जोडले जात असल्याच्या चर्चेवर त्यांनी स्पष्ट केले की, “ती सर्व बँक खाती बनावट (Fake) आहेत आणि त्याचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येईल.” या विधानामुळे तपासाला आता नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेशी रुपाली चाकणकर यांचे नाव जोडले गेल्याने आणि काही फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या वादामुळे चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी या प्रकरणावरून रान पेटवले होते. मात्र, आज स्वतःहून चौकशीला सामोरे जाऊन चाकणकर यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता SIT च्या चौकशीतून काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

