मुंबई : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनंतर अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी बरखास्त करण्यात आले. त्यातच आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता असलेल्या एसटी बँकेच्या म्हणजेच द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेचे नवे संचालक मंडळ बँकेतील कारभारावरून व्यवस्थापकीय संचालकांवर नाराज असल्याची माहिती आहे.
व्यवस्थापकीय संचालक हे सदावर्ते यांचे निकटवर्तीय आहेत. त्यातच बँकेचा सीडी रेशो वाढल्याने पैसे काढण्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेत नवे संचालक मंडळ आल्यानंतर ४६६ कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, बँकेचा सीडी रेशो ९५.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, ३० जून २०२३ च्या आधी २ हजार ३११ कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत होत्या. या ठेवी नवे संचालक मंडळ बसण्याआधी होत्या. पण आता या ठेवींमध्ये घट होऊन त्या १८४५ कोटींवर आल्या असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचा क्रेडिट-डिपॉझिट रेशो हा ९५.४९ टक्क्यांवर आल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पैसे काढण्यावर मर्यादा येण्याची शक्यता
सर्वसाधारणपणे को-ऑपरेटिव्ह बँकेचा सीडी रेशो हा ६० ते ७० टक्क्यांमध्ये पाहायला मिळतो. पण एसटी बँकेचा हा रेशो ९५.४९ टक्क्यांवर पोहचला. त्यामुळे जर सीडी रेशोत आणखी वाढ झाली तर बचत खात्यातील पैसे काढण्यावर मर्यादा येऊ शकते. तसेच ३० जून रोजी नवे संचालक मंडळ आल्यावर एकूण कर्जे १७७६ कोटी रुपये होते. पण आता तीच कर्जे १७६१ कोटी रुपये झाली असल्याची माहिती देण्यात आली.
बँकेसाठी काही बाबी धोकादायक
द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण ५० शाखा आहेत. तसेच याचे ११ विस्तार केंद्रे आहेत आणि ६२ हजार सभासद आहेत. सध्या यामधील साधारण ३ हजार सभासद निवृत्त झाले असून त्यामधील काहींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही बाब देखील बँकेसाठी धोकादायक ठरु शकते. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या अंदाजे ३ हजार सभासदांची देणी पैसे नसल्याने मिळाली नसल्याचा सभासदांना आरोप आहे.