शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून बुधवारी येरोळ मोड, उजेड व तळेगाव दे.येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आले. या वेळी जय जिजाऊ जय शिवराय, जरांगे पाटील तुम आगे बढो, या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आरक्षणाच्या मुद्याकडे नेतेमंडळींकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ प्रत्येक गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत असल्याचे बॅनर लावले जात आहेत. दरम्यान तालुक्यात सकल मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. उजेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यात सर्वांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. उजेड पाटीवर निलंगा-घरणी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तसेच लातूर – उदगीर रोडवर येरोळ मोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.