22.4 C
Latur
Friday, February 27, 2026
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झाले. अजित पवारांमुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती. सामान्य कुटुंबातून ते आले होते. २०२३ मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही केली.

पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अजितदादा २८ जानेवारी रोजी आपल्यातून निघून गेले. आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होते. आपल्या सर्वांना प्रश्न होता, उद्या आपण काय करणार, कसे करणार, पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

मागच्या महिन्यात आपल्या पक्षाशी संबंध नसताना काहीजण बोलू लागले, आम्ही काय करायचे ते सांगायला लागले. पोटात एक आणि ओठात एक बोलू लागले. परंतु आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले. आपण योग्यवेळी योग्य निर्णय केला. आता आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचे आहे. आता आपण नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आपली वाटचाल करणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. सगळ््या प्रांतातील लोक या ठिकाणी आले आहेत, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR