रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीसह विरोधकांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांचीही कोंडी झालेली असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावे अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे. ते रत्नागिरी इथे पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचे एक वैशिष्ट्ये होते की, हा समाज इतर जाती-जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितले तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषत: जरांगे यांनी स्वत:ही अशी भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की धनगर, मुस्लीम, ंिलगायत अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावे. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावे, असे आमचे म्हणणे आहे अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकार दरबारी हालचाली
मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारची कोंडी झाली असून विधानसभा निवडणुकीच्या आधी ही कोंडी फोडण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आज होणा-या उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटियर संदर्भात काही निर्णय होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.