नांदेड : प्रतिनिधी
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नांदेड दौ-यात विविध राजकीय आणि औद्योगिक विषयांवर सविस्तर भूमिका मांडत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्याचबरोबर शिवसेना पक्ष व चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, कथित ऑडिओ क्लिप प्रकरण, पंकजा मुंडे यांच्याबाबतची चर्चा आणि नांदेडमध्ये प्रस्तावित हेली प्लांट या विषयांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या सोशल मीडिया पोस्टचा निषेध करताना सामंत म्हणाले की, काँग्रेसच्या या भूमिकेतून महिलांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सक्षमपणे काम करत आहेत. अशा नेतृत्वावर वैयक्तिक टीका करणे योग्य नसून, येणा-या निवडणुकांमध्ये राज्यातील महिला काँग्रेसला याचे उत्तर देतील, असा दावा त्यांनी केला.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदभार्तील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावासंदभार्तील सर्व आवश्यक कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात येतील.
पक्षाचे विधिज्ञ सक्षमपणे युक्तिवाद करतील आणि सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप नेते चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी व्हावी, अशी मागणी केली. ही ऑडिओ क्लिप कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आली असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. सत्य समोर येण्यासाठी पोलीस तपास आवश्यक असून, जर ही क्लिप खोटी ठरली तर बदनामी करणा-यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
















