37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरगेवराईत पथकाची ‘निगराणी’; कारमध्ये आढळले एक कोटी रुपये

गेवराईत पथकाची ‘निगराणी’; कारमध्ये आढळले एक कोटी रुपये

गेवराई (जि.बीड) : तालुक्यातील खामगाव येथील निगरानी पथकास तपासणी करताना एका कारमध्ये तब्बल एक कोटी रुपये आढळून आले. हा प्रकार ७.३० च्या सुमारास उघडकीस आला. सदरील रोकड जप्त करुन कोषागार विभागाकडे देण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

छत्रपती संभाजी नगरवरुन येणारी कार क्रमांक एमएच-२३ एडी-०३६६ ची तपासणी खामगाव येथील एसएसटी पथकाने केली असता त्यामध्ये एक लोखंडी पेटी आढळून आली. सदरील पेटी उघडली असता त्यामध्ये एक कोटी रुपये आढळून आले. याबाबतची माहिती अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदिप खोमणे व पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळास भेट दिली. वाहन चालकास सदरील रकमेबाबत माहिती विचारली असता ही एक कोटी रुपये बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची आहे.

छत्रपती संभाजी नगर मंत्री बँकच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे सांगण्यात आले. कारमध्ये तीनजण होते असे सूत्रांनी सांगितले. सदरील रकमेच्या वाहतुकीबाबत निवडणूक आयोगाच्या इएमएमएसएद्वारे जनरेट झालेला बारकोड नव्हता. परंतु त्यांच्याकडे संभाजी नगर येथून परवानगी पत्र होत असे अधिका-यांनी सांगितले. त्यामुळे सदरील रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. सदरील घटनेचा पंचनामा पथक प्रमुख महेश मेटे यांनी करुन पुढील कारवाईसाठी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. या कारवाईत अधिका-यांसोबतच काशिनाथ माने, शरद मिसाळ, धीजर खांडेकर यांचाही सहभाग होता.

तपासणी करुन रक्कम दिली जाणार परत
१० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्याने जप्त करण्यात आलेली रक्कम ही कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाईल. त्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजी नगर येथील बँकच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती की नाही याची माहिती घेतील. त्यात तथ्य आढळून आले तर सदरील एक कोटी रुपयांची रक्कम परत दिली जाणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR