नवी दिल्ली : क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी भारतीय वायुसेनेचा (एआयएफ) सूर्यकिरण संघ रोमांचकारी हवाई प्रदर्शन करणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १९ नोव्हेंबरला अंतिम सामन्यापूर्वी दहा मिनिटांचा एरोबॅटिक्स शो होणार आहे. सूर्यकिरणची हॉक एअरक्राफ्ट टीम नऊ विमानांसह आकाशात थरारक स्टंट करणार आहे. इतिहासात प्रथमच विश्वचषकाच्या सामन्यापूर्वी हवाई दलाचे विमान उड्डाण करणार आहे. हा शो प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा आणि उत्साह भरणार आहे.
जगातील केवळ निवडक देशांमध्ये सूर्यकिरणसारखे संघ आहेत. विमानाने हवेत स्टंट करणे सोपे नाही. यासाठी प्रशिक्षित पायलट आणि कौशल्य आवश्यक आहे. किरकोळ चुकीलाही येथे वाव नाही. स्टंट करताना काही सेकंदात निर्णय घ्यावा लागतो. हॉक विमाने केवळ कलाबाजी करत नाहीत तर ते रंगीबेरंगी धूर देखील उत्सर्जित करतात, ज्यामुळे आकाश रंगांनी भरते. १९९६ मध्ये सूर्यकिरण संघाची स्थापना करण्यात आली. हा संघ हवाई दलाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. भारतीय हवाई दल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आहे. प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे की, भारतीय संघाने विश्वचषकाची चमकणारी ट्रॉफी आपल्या नावे करावी.
अंतिम सामन्याच्या दिवशी एकीकडे क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना एका खास एअर शोचा थरारही अनुभवता येणार आहे. या शो चा थरार चाहते स्टेडियममध्ये जाऊन पाहू शकतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपरहिट सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये शेवटच्या वेळी २००३ मध्ये वर्ल्ड कप अंतिम सामना खेळाला गेला होता. यावेळी ऑस्ट्रेलियन टीम जिंकली होती. तसेच समारोप समारंभ आयोजित आयोजित करण्याबाबत बीसीसीआयने दुजोरा दिलेला नाही, पण पॉप स्टार दुआ लिपा या कार्यक्रमात परफॉर्म करू शकते अशी बातमी आहे.