वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
मुंबईवर २००८ साली २६/११ चा भीषण हल्ला झाला होता. आजही मुंबईकरांच्या मनात या हल्ल्याच्या आठवणी ताज्या आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून ताज हॉटेलसह अन्यत्र अंदाधुंद गोळीबार केला होता. आजही या हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. याच हल्ल्यातील एक आरोपी तहव्वूर राणा अमेरिकन तुरुंगात बंद आहे.
अमेरिकन सुप्रीम कोर्टाने त्याच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली आहे. एकप्रकारे अमेरिकी कोर्टात भारताचा हा मोठा विजय आहे. त्यामुळे त्याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाऊ शकते.
ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकेच्या सत्र न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यर्पण करारांतर्गत तहव्वुर राणाला भारतात पाठवण्याचा आदेश दिला होता. सत्र न्यायालयाने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा केला होता. पण राणाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी दिली. तहव्वुर राणाला आता भारतात आणले जाईल. त्याच्यावर इथे खटला चालेल. २६/११ हल्ल्यातील त्याचा रोल काय? कारस्थान कसे रचले? या सगळ््याची चौकशी होईल.
तहव्वुर राणावर २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची मदत केल्याचा आरोप आहे. हेडलीच्या इशा-यावर तो संपूर्ण कट अमलात आणत होता. राणा डेविड हेडलीचा राइटहॅण्ड होता. कंट्रोल रुममध्ये जो माणूस बसलेला तो तहव्वूर राणाच होता असे म्हटले जाते. मुंबई हल्ल्यातील दोषी राणा भारतात आल्यानंतर तपास यंत्रणांना २६/११ हल्ल्याच्या कारस्थानाबाबत बरीच माहिती मिळू शकते. कोणाची काय भूमिका होती, कोण-कोण या कटात सहभागी होते, ते स्पष्ट होईल.