तायपेयी सिटी : तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, तैवान भारतातील सुमारे एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. हे लोक तैवानच्या फॅक्ट्री, शेतात आणि हॉस्पिटलमध्ये काम करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये या संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो. हा करार झाला तर ही बाब चीनच्या पचनी पडणे कठीण होईल. अलीकडच्या काळात, चीनची अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे, तर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
तैवानमध्ये वृद्धांची संख्या सातत्याने वाढत आहे. तेथे कामगारांची नितांत गरज आहे. दुसरीकडे, भारतात लोकसंख्येनुसार नोक-या निर्माण होत नाहीत. २०२५ पर्यंत तैवान एक सुपर एज्ड सोसायटी बनेल असा अंदाज वर्तवण्यात आला. तेथील लोकसंख्येतील वृद्धांची संख्या २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र भारत आणि तैवान यांच्यातील करारामुळे चीनसोबतचा तणाव वाढणार हे नक्की. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. तैवानशी कोणत्याही देशाचे आर्थिक संबंध असावेत असे चीनला वाटत नाही. तर दुसरीकडे चीनचा सीमेवरून भारतासोबत आधीच वाद सुरू आहे.
करार अंतिम टप्प्यात : बागची
भारत-तैवान यांच्यातील करार अंतिम टप्प्यात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले. या संदर्भात तैवानच्या कामगार मंत्रालयाने या करारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जे आपल्याला सहकार्य करतील आणि लेबर पुरवतील त्यांचे आम्ही स्वागत करतो असे तैवानचे म्हणणे आहे. तैवानला जाऊ इच्छिणा-या भारतातील लोकांचे हेल्थ सर्टिफाईड करण्याच्या यंत्रणेवर काम सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तैवानमधील बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे. तैवानची अर्थव्यवस्था ७९० अब्ज डॉलर्सची आहे आणि ती टिकवण्यासाठी देशाला लेबर्सची गरज आहे.