हैदराबाद : तेलंगणा विधानसभेच्या ११९ जागांसाठी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून ती सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील १०६ मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या १३ मतदारसंघात सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच दुपारी १ वाजेपर्यंत ३६.६८ टक्के मतदान झाले आहे.
या कालावधीत गुरुवारी ३ कोटी २६ लाखांहून अधिक लोक मतदान करणार आहेत. मतदानासाठी राज्यभरात ३५६५५ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेलंगणामध्ये एकूण २,२९० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रामुख्याने बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या अपंग मतदारांनीही मदत करण्यात येत आहे. काही ठिकाणी त्यांना व्हीलचेअरवर बसवून मतदान केंद्राच्या आत नेण्यात येत आहे.
मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
जानगाव येथील मतदान केंद्रावर काँग्रेस, भाजप आणि बीआरएस कार्यकर्त्यांचे गट एकमेकांना भिडले. या सगळ्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
तांत्रिक कारणामुळे मुतदानाला उशीर
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी ज्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत त्या मतदान केंद्रावर काही तांत्रिक कारणामुळे मुतदानाला उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे मतदान केंद्र राजेंद्र नगरमध्ये असून त्यांची संख्या ३९७ आहे.
लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले
तेलंगणात मतदान सुरू होताच, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट केले आणि लिहिले की, मी तेलंगणातील माझ्या बहिणी आणि भावांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन करतो. ते पुढे म्हणाले की, मी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात वापरण्याचे आवाहन करतो.
दुपारी १ वाजेपर्यंत तेलंगणातील जिल्ह्यांतील मतदान
महबूबाबाद – ४६.८९ टक्के
मेडक – ५०.८० टक्के
मुलुगु – ४५.६९ टक्के
सिद्धीपेट ४४.३५ टक्के
हैदराबाद – २०.७९ टक्के
रंगारेड्डी – २९.७९ टक्के