मुंबई : साखर आयुक्तालयाने कारखान्यांना गाळप परवाने देणे सुरू केल्यामुळे गाळप हंगाम कधी सुरू होणार या विषयीची अनिश्चितता संपली आहे. शुक्रवारपासून (१५ नोव्हेंबर) कारखान्यांची धुराडी पेटणार आहे. यंदाचा साखर हंगाम दिवाळीमुळे अगोदरच पंधरा दिवस उशिराने सुरू होत आहे. त्यात राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून निवडणुकीनंतर हंगाम सुरू करण्याची विनंती केली होती.
त्यामुळे साखर हंगामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. खासगी, सहकारी साखर कारखान्यांच्या दबावामुळे सरकारला नमते घ्यावे लागले असून, आयुक्तालयाने गाळप परवाने देणे सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या गाळप हंगामात २०४ खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, शुल्क भरले, अशा कारखान्यांना गाळप परवाना दिला जात आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ८० आणि सायंकाळपर्यंत शंभरहून जास्त कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला. त्यामुळे राज्यात कारखान्यांची धुराडी पेटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.