बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. अशातच काहींकडून नेते आणि मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला चढवला होता. आक्रमक आंदोलकांनी बंगला जाळला, तसेच आवारातही मोठी जाळपोळ केली. याबाबत संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेन, असेही संदीप क्षीरसागर यांनी ‘हल्ला मराठा समाजाने केलेला नाही, समाजकंटकांनी केलेला असावा’ असे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, घरावर हल्ला झाला तेव्हा सर्व कुटुंब घरातच होते, हल्ला मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, याबाबत योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेन, असे ते म्हणाले आहेत.
‘३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मूल, पत्नी आणि सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत’, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा. याबाबत आताच काही बोलणार नाही, तसेच योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेल, असे संदीप क्षीरसागर फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.