मुंबई : प्रतिनिधी
आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी ठराविक वेळमर्यादा घालून दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेताना २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांना भेटायला गेलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत मुदत मिळाल्याचे सांगितले होते. त्यावरून तारखांचा घोळ घातला गेला होता. मात्र, जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबर हीच अखेरची मुदत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे अजूनही तारखांचा घोळ सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात मध्यस्थी करणारे आमदार बच्चू कडू यांनी आपले मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. आता दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबतचा तोडगा काढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तारखेचा घोळ मिटू शकतो.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत दुस-यांदा बेमुदत उपोषण सुरू केले होते आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, २ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे (उपोषणस्थळी) जाऊन भेट घेतली. या भेटीत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी २ महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतले. अर्थात, जरांगे पाटील २४ डिसेंबरपर्यंतच मुदत देण्यावर ठाम होते. मात्र, जरांगे पाटील यांनी २ जानेवारी २०२४ पर्यंतचा वेळ दिला असल्याचे राज्य सरकारच्या वतीने खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितले. त्यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय कधीपर्यंत घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात, २४ डिसेंबर की, २ जानेवारी यावरून उलटसुलट चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विषयावर मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांशी सातत्याने चर्चा करत असलेले आमदार बच्चू कडू यांनी तारखेच्या घोळावर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्या तारखेच्या आत हा प्रश्न सोडवावा लागेल, असे बच्चू कडू म्हणाले. गेल्या काही दिवसांत या प्रश्नावर सरकारने काय प्रगती केली, ते जरांगे यांच्यासमोर मांडू. मनोज जरांगे यांच्याकडे पुन्हा वेळ मागण्याची आवश्यकता भासणार नाही. आम्ही तसा प्रयत्न करू, असेही बच्चू कडू म्हणाले.
२४ डिसेंबरच अंतिम मुदत
राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत बोलताना जरांगे पाटील पुण्यात म्हणाले की, कोणी काही म्हणो, आम्ही २४ डिसेंबरवरच ठाम आहोत. मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. २४ डिसेंबरपर्यंत सगळ््यांना दाखले मिळतील, असा विश्वास आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारची अडचण होणार आहे.
एका व्यक्तीला सोडून सर्वांना सद्बुद्धी दे : जरांगे पाटील
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातील खराडी परिसरात जाहीर सभा पार पडली. मनोज जरांगेंनी पुण्यातील सभेनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांनी त्यांना आज दगडूशेठ गणपतीकडे काय मागितले, असा प्रश्न केला. यावेळी एक व्यक्ती सोडून सगळ््यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थना आज बाप्पाकडे केली. कारण त्या व्यक्तीला सद्बुद्धी मिळणारच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.